न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :-पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालया शेजारील मोकळ्या जागेत वर्षांनुवर्ष दुचाकीपासून ते ट्रकपर्यंत भंगार वाहने पडून आहेत. ही वाहने आरटीओने वेगवेगळ्या कारणांसाठी जमा केली आहेत; मात्र ही वाहने पुन्हा नेण्यासाठी मालक येत नाही. त्यामुळे वाहनांच्या संबंधित मालकांनी आपल्या वाहनांच्या कागदांची पूर्तता करून, ती घेऊन जावीत, अन्यथा ती वाहने भंगारात घालण्यात येणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.
येथे जमा वाहनांपैकी १९ वाहन मालकांना कर व देणे शुल्क पूर्ण करण्याबाबत आवाहन केले आहे. त्यापैकी अनेक वाहने रस्त्यावर चालण्यायोग्य नसल्याने त्या वाहनांना स्क्रॅप करावे लागणार आहे. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयलगत असलेली ही वाहने डोकेदुखी ठरू लागली आहेत. त्यापैकी ६३ वाहनांच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कार्यालयालगत असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये जवळपास शंभरहून
ही वाहने गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी पडून असल्याने खराब होऊन त्याचे मूल्य दिवसेंदिवस कमी झाले आहे. यापैकी अनेक वाहनाचे केवळ सांगाडे उरले आहेत. एकाच ठिकाणी वाहने उभी केल्याने इंधन गळती होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही वाहने प्रशासनाची डोकेदुखीदेखील ठरू लागली आहे. या वाहनासाठी प्रशासनाचा अतिरिक्त वेळ, श्रम आणि साधनसंपत्तीदेखील खर्च होत आहे.
अनेक वर्षांपासून लिलाव प्रक्रियेमध्ये वाहनांची विक्री न झाल्याने ती वाहने येथेच पडून आहेत. ऊन-पावसामध्ये त्यापैकी अनेक वाहनांना गंज चढला आहे. त्यामुळे आता ती वाहने रस्त्यावर धावण्यायोग्य नाहीत. ती वाहने भंगारजमा झालेली आहेत. त्यामुळे आता अशा वाहनांची माहिती आरटीओने गोळा केली आहे. ती एमएसटीसी (मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड) या पोर्टलवर माहिती टाकून ती स्क्रॅप करण्यात येणार आहेत.














