- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अडलेली कामे मार्गी लावण्याच्या केल्या आयुक्तांना सूचना?..
- आ. अण्णा बनसोडे यांचा महापालिकेवरील होल्ड सुटला?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 06 मार्च 2025) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तथा राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत आज गुरूवारी अचानक एन्ट्री केली. अशा त्यांच्या अचानक येण्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत शहरातील विविध समस्यांवर त्यांनी बैठकीत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यातील दुखरी बाजू म्हणजे सत्ताधारी भाजपमूळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आयुक्तांकडूनच दुजाभाव होत असल्याची ओरड थेट सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यामुळेच पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवड महापालिका गाठून आयुक्तांचे कान उपटले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अडलेली कामे त्वरीत मार्गी लावण्याच्या सुचना आयुक्तांना केल्याचे समजते.
त्यावर आयुक्तसाहेबांनी देखील आठवडाभरात आढावा घेऊन सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन खा. सुनेत्रा पवार यांना दिल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
“खा. सुनेत्रा पवार यांच्या त्या भेटीमुळे आ. अण्णा बनसोडे यांची निष्क्रियता सिध्द होत आहे. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे ते एकमेव आमदार आहेत. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समस्या त्यांच्याकडून सुटत नाहीत? त्यांचे आयुक्त ऐकत नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचा फटका निश्चितच आगामी महापालिकेच्या निवडणूकीत पक्षाला बसु शकतो”.














