न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २० मे २०१९) :- लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्या आणि संस्थांकडून जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये देशाप्रमाणे महाराष्ट्रही शिवसेना – भाजप युतीकडेच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
युतीला सरासरी ३५ ते ३८ जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला १२ ते १३ जागांवरच समाधान मानावे लागेल, असा कल या एक्झिट पोलमधून व्यक्त झाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपने काँग्रेस आघाडीवर दणदणीत विजय मिळवला होता. ४८ पैकी ४२ जागा पटकावत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गड उद्ध्वस्त केले होते. राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या होत्या. भाजप हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या पक्षाने २३ जागा तर शिवसेनेने १८ जागा मिळवल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज शेट्टींनी एक जागा जिंकली होती. राजू शेट्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होते. यावेळी आपल्याला चांगले यश मिळेल, अशी आशा बाळगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली होती.
विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न चालवला होता. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड सभा घेत राज्य ढवळून काढले होते. काँग्रेसला मात्र, या निवडणुकीच्या दरम्यान धक्क्यावर धक्के बसत गेले. काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत नव्हता. तरीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात सभा गाजवल्या. या सभांचा फायदा काँग्रेस आघाडीला मिळेल, असे तर्क त्यावेळी वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्षात एक्झिट पोलचा कौल पाहता या मुद्द्याचा म्हणावा तितका फायदा आघाडीला मिळाला नाही, असेच म्हणावे लागेल. भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी यांनी या निवडणुकीत एकत्र येत वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. या आघाडीने सर्वच्या सर्व ४८ जागा लढवल्या. मात्र, या एक्झिट पोलमध्ये या आघाडीला एकही जागा दाखवलेली नाही.
कुणाला किती जागा मिळतील?
भाजप – २३
शिवसेना – १८
राष्ट्रवादी – ४
काँग्रेस – २
स्वाभिमानी शेतकरी संघटना – १















