न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी एका विभागात ३ वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले असून, त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होत आहे. कामकाजासंदर्भातील तक्रारीत त्यामुळे वाढ झाली आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार महापालिकेत एका विभागात अधिकारी व कर्मचारी ३ वर्षे काम करून शकतो. त्यानंतर त्याची पालिकेच्या दुस-या विभागात बदली केली जाते. त्यानुसार पालिका प्रशासन दर तीन वर्षांनी अधिकारी व कर्मचा-यांची अंतर्गत बदल्या करतात. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या वर्षी अनेक अधिकारी व कर्मचा-यांच्या बदलीचे आदेश काढून अमेरिकेत सुटीसाठी जाणे पसंत केले होते. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचा-यांना बदलीच्या जागी इच्छा नसताना रूजू व्हावे लागले. मात्र, त्यातून दोन अधिका-यांना तांत्रिक कारणांमुळे सूट देण्यात आली. मात्र, पालिकेत काही अधिकारी व कर्मचा-यांनी ३ वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असल्याचे दिसत आहेत.
त्यामुळे त्या अधिकारी व कर्मचा-यांची मुजोरी वाढते. कोणतीही वरिष्ठ आले तरी, आपल्या शिवाय फाईल हलणार नाही, असा एका त्याचा होरा असतो. त्यामुळे लाभाच्या फाईली गायब होतात आणि कामकाज संथगतीने चालते. परिणामी, ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या अनुषंगाने तीन वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या मुख्य लिपिक, लिपिक, शिपाई यांची दुस-या विभागात बदली करावी, अशी तक्रार लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.











