- मग नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
- सांगवीतील त्या घटनेवर नागरिकांची टिकेची झोड..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- सध्या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीला वेगळच वळण मिळालेल दिसत. आताची युवा पिढी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठल्याही थराला पोहोचते. कधी उड्डाणपुलावर तर, कधी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर स्वतःचा वाढदिवस टाळक्यांच्या उपस्थितीत गाड्याघोड्या घेऊन आरडाओरडा आणी बिभत्स वर्तन करीत साजरा केला जातो. बहुधा ही प्रथा हल्ली पोलिसांनाही आवडु लागली आहे की काय? असा सवाल उपस्थित होतोय.
दरम्यान हाकेच्या अंतरावर असणाऱ्या
सांगवी पोलीस ठाण्याच्या आवारातील भर रस्त्यात एका पोलीसाने आपला वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर तुफान व्हायरल होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या बर्थडे सेलिब्रेशनचं आयोजन चक्क गुन्हेगारांनी केलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रात्री बाराच्या सुमारास भर रस्त्यातच हे बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आल होतं. त्यावेळी चार गुन्हेगार तिथे उपस्थित होते.
चारपैकी दोघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आणि दोघांवर हाणामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे पोलिसाच्या या वर्तवणुकीवर नागरिकांमधून टीकेची झोड उठली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात ‘पोलीस शिपाई’ या पदावर हे महाशय कार्यरत असल्याचे समजते.
मध्यंतरी या वाढदिवस करण्याच्या प्रथेला नागरिकांकडून मोठा विरोध झाला होता. पोलीस रस्त्यावर उतरून अशा पद्धतीला आळा घालत होते. परंतु, आता पोलीसच अशा ट्रेंडमध्ये अडकू लागले आहेत. मग नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.
“दरम्यान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याप्रकरणाची दखल घेत बर्थडे बॉय प्रवीण पाटिल, विवेक गायकवाड़, विजय मोरे आणि सुहास डांगरे यांना निलंबित केले आहे. तर,
सांगवी पुलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची तडकाफडकी बदली करून त्यांना नियंत्रण कक्षासी जोडले आहे.”
– स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय…











