न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आता भाविकांना तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही. पुरुष व महिला भाविकांना आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे .राज्यातील अनेक देवस्थानांनी यापूर्वीच ड्रेस कोड लागू केले आहेत .त्याचप्रमाणे जेजुरीच्या खंडोबा गडावर सुद्धा आता ड्रेस कोड लागू झाला आहे.
श्री मार्तंड देवस्थानने आज जेजुरी गडावर वस्त्र संहिता जपण्यासाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आज गडाच्या मार्गावर सूचना फलक लावण्यात आले. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त ॲड पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर, मुख्य व्यवस्थापक आशिष बाठे ,सतीश घाडगे ,विलास बालवडकर, बाल अभिनेता दर्श खेडेकर आदि उपस्थित होते.
मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी फलकाचे उद्घाटन केल्यानंतर येथील पावित्र्य जतन करण्यासाठी खंडोबा देवस्थानने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाविकांना विनंती केली आहे, आपण आपल्या घरी पूजा, मंगल कार्य असल्यावर जसे कपडे परिधान करतो ,तसे कपडे परिधान करून गडावर यावे. हा नियम पुरुष व महिला दोघांनाही लागू आहे .गुडघ्यापेक्षा वर असणारे कपडे परिधान करू नये .शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट, फाटलेल्या जीन्स, हाफ पॅन्ट,( बर्मुडा )असा पेहराव नको. इतरांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करून गडावर येऊ नये.सध्या आम्ही सर्वांना विनंती करीत आहोत ,परंतु त्यातूनही जे नियम मोडतील त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल असे सांगितले.














