न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- महापालिका शहरातील अनधिकृत व धोकादायक जाहिरात होर्डिंगवर कारवाई न करता केवळ पोलिसात तक्रार देऊन गप्प बसते. पोलिसांकडे गुन्हेगारीसंदर्भातील तक्रारींची संख्या मोठी असते. त्यामुळे या तक्रारीकडे ते जास्त लक्ष देत नाहीत. अनधिकृत होर्डिंगचालकावर कोणतीच कारवाई होत नाही. परिणामी, शहरात अनधिकृत होर्डिंग लावण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्याला आळा बसत नाही, असा आरोप सरदार सिंह यांनी केला आहे.
तसेच, होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट पुण्यातील सीओईपीकडून घेण्याची सक्ती आकाशचिन्ह व परवाना विभागाने केली आहे. त्या दाखल्यासाठी सीओईपीकडून भरमसाट शुल्क आकारले जात आहे. तर, काहींना बोगस दाखले देण्यात आले आहेत.
हा प्रकार बंद करून दोषींवर कारवाई करावी. महापालिका पॅनेलवरील अभियंत्यांकडून दाखला देण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी द्यावी. आकाशचिन्ह व परवाना विभागाने आपली जबाबदारी झटकू नये, अशी तक्रार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे त्यांनी केली आहे.














