न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- चिंचवड येथील चापेकर चौकात २०० हून अधिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नदीकाठ विकास प्रकल्पाला विरोध केला. स्थानिक नद्यांच्या शुद्धीकरणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
चिंचवडच्या चापेकर चौकात जमलेल्या नागरिकांनी पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या आरोग्य व भविष्यासाठी चिंता व्यक्त केली. नागरिकांनी नदी प्रदूषण रोखणे, शंभर टक्के सांडपाणी प्रक्रिया सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता नैसर्गिक नदीकाठ जपण्याची गरज अधोरेखित केली. या आंदोलनात अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संघटना आणि सामाजिक प्रतिष्ठानांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
पिंपरी-चिंचवडमधील नद्यांना अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा फटका बसत आहेत. स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींनी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी वारंवार मागणी केली असली, तरी महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे व पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवडमधील नद्या पाणीपुरवठ्यासह सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वयाच्या आहेत. मात्र, त्यांची हेळसांड होत आहे. यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, नागरिकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून आपला विरोध नोंदवला.
आंदोलनातून प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराने नद्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याची जबाबदारी अंगीकारावी, असा संदेश दिला. यावेळी आमदार अमित गोरखे यांना निवेदन दिले. त्यांनी शासन पातळीवर यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले.














