न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी मार्केट येथे महानगरपालिकेच्या वतीने वाहन-मुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पिंपरी मार्केटमधील संपूर्ण रस्ते दोन दिवस सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.
‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या समारोप सत्रामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वाहतूक पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील, प्रतिनिधी डब्बू आसवानी, मराठी अभिनेते अभिज्ञा भावे, दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी नीरज चावला, पुरुषोत्तम बोधवानी तसेच शहरविकास तज्ज्ञ प्रसन्न देसाई, आशिक जैन यांच्यासह स्थानिक दुकानदार व नागरिकांशी चर्चा केली.
यामध्ये दुकानदार संघटनांनी महापालिकेच्या वतीने ३० आणि ३१ मार्च रोजी पुन्हा वाहन-मुक्त उपक्रम राबविण्यात यावा, बाजारपेठांचा मार्ग कायमस्वरुपी पादचारीमार्ग व्हावा, अशी विनंती आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.
वाहन-मुक्त उपक्रमादरम्यान पिंपरी मार्केटमध्ये नवीन ग्राहकांमध्ये २० टक्के वाढ झाली असून वाहनमुक्त वीकेंडमुळे व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर ध्वनी, वायू प्रदूषण आणि वाहतूक कोंडी दूर झाल्यानंतर नागरिक सहजरित्या बाजाराकडे आकर्षित होतात. दुकानदार संघटनेने सुरुवातीला उपक्रमाबाबत शंका व्यक्त केली. परंतू वाहन मुक्त उपक्रमाच्या यशानंतर या उपक्रमामध्ये क्षमता असल्याचे जाणवत आहे. आमची कुटुंबे पिढ्यानपिढ्या या व्यवसायात आहेत, परंतु वाढती वाहतूक कोंडी पुढील पिढीला पुढे जाण्यापासून परावृत्त करत आहे. वाहन-मुक्त दिन यांसारखे उपक्रम पादचाऱ्यांसाठी अनुकूल बाजारपेठ खरेदीला अधिक आनंददायी अनुभव बनवू शकतात आणि यामुळे व्यवसाय देखील भरभराटीला येऊ शकते, असे नागरिक प्रतिनिधी डब्बू आसवानी यांनी सांगितले.














