न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची अर्धवट स्थितीतील कामे पूर्ण करण्यासाठी प्रकल्प सल्लागाराला पुन्हा दीड वर्षाची मुदतवाढ पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्याकरिता महापालिकेवर आणखी ३ कोटी ९५ लाख ९६ हजार ४० रुपये खर्च करणार आहे.
सीसीटीव्ही सर्व्हेलन्स या कामासाठी ई अॅण्ड वाय एलएलपी या कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून ७ जून २०२१ ला नेमणूक करण्यात आली होती. मुदतीमध्येही काम पूर्ण न झाल्याने आता ६ जून २०२५ पर्यंत एका वर्षाची तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यात सीसीटीव्ही सर्व्हलन्सच्या टप्पा एक व टप्पा दोनसह माहिती व जनसंपर्क विभागाकडील सिटी हब फॉर डाटा अॅण्ड कम्युनिकेशन अशी तीन कामे या सल्लागाराला देण्यात आले आहेत. निविदा न काढता हे काम थेट पद्धतीने देण्यात आले आहे.
प्रकल्प सल्लागार म्हणून तीन मॅनेजमेंट कन्सल्टंट, तीन सीनिअर कन्सल्टंट आणि एक कन्सल्टंट असे सात जणांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्यावर ३ कोटी ९५ लाख ९६ हजार ४० रुपये (अधिक प्रत्यक्ष कर) असा खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेच्या महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रस्तावानुसार प्रकल्प सल्लागाराला दीड वर्षांची चौथी मुदतवाढ देण्यास आणि त्यासाठी खर्च करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.














