न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २० मे २०१९) :- निगडी येथील कै. मधुकर पवळे पुलाजवळ पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपरी चिंचवड शहरवासीय एकीकडे पाणीटंचाईला सामोरे जात असताना महापालिकेच्या गलथान कारभारामुळे आज लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया गेले आहे. तब्बल दोन तासहून अधिक वेळ लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.
मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याबाबत कळवले आहे. तसेच तातडीने पाण्याचे वॉल बंद करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसात पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेकडून होत असलेल्या या गलथान कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ६ मे पासून पिंपरी चिंचवड शहरवासीय पाणी समस्येला सामोरे जात आहेत.











