न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात क्षेत्रीय कार्यालय, करसंकलन कार्यालय, पाणीपुरवठ्याच्या पाण्याचा टाक्या, विविध उद्याने आणि महत्त्वाच्या मिळकती आहेत. त्या मालमत्तांच्या सुरक्षा ठेवण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने रखवालदाराचे मदतनीस नेमण्यात आले आहेत.
दरम्यान एम. के. फॅसिलिटीज सर्व्हिसेस प्रा. लि.चे अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयातील मालमत्तेसाठी ३७० रखवालदार मदतनीस नेमले आहेत. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसने ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयासाठी ३७७ रखवालदार मदतनीस नेमले आहेत. सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी प्रा. लि.चे क आणि ई क्षेत्रीय क्षेत्रातील मालमत्तांसाठी ३९४ रखवालदार मदतनीस नियुक्त आहेत. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. कडून ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मालमत्तेसाठी ४११ रखवालदार नेमले आहेत. असे एकूण १ हजार ५५२ रखवालदार मदतनीस नेमले आहेत.
दरम्यान निविदा न काढता एजन्सींना १ डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अशी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. मुदत संपल्यानंतर आता पुन्हा १ ते ३१ मार्च अशी महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदाप्रक्रिया राबविण्यास विलंब होत असल्याचे कारण सुरक्षा विभागाने प्रस्तावात दिले आहे. कंत्राटी पद्धतीने रखवालदार मदतनीस पुरविण्याच्या कामास पुन्हा मुदतवाढ देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी सुटत नसल्याचे चित्र आहे. अनेक चौकात ट्रॅफिक वार्डन दिसून येत नाहीत. त्यामुळे ते नक्की काय काम करतात, अशी शंका उपस्थित केली जात आहे.