- प्लॉटिंगमधील बांधकामाचे काम देण्यासाठी नागरिकाची अडवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १६ मार्च २०२५) :- प्लॉटिंगमधील बांधकामाचे काम देण्याच्या मागणीसाठी रस्त्यात कंटेनरची केबिन ठेवून रस्ता अडवला. काम दिले तरच केबिन काढू, असे धमकावून खंडणी मागितली. खेड तालुक्यातील कुरुळी येथील इंद्रायणी पार्क प्लॉटिंगच्या मुख्य रस्त्यावर ३१ डिसेंबर २०२४ ते १४ मार्च २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.
धर्मसिंग मुक्त्त्यारसिंग पाटील (३९, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ गाव विटनेर, ता. पारोळा, जि. जळगाव) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (१४ मार्च) महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अमर एकनाथ कांबळे, अनिल एकनाथ कांबळे (दोघेही रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अमर आणि अनिल यांनी एक मोठी कंटेनरची केबिन फिर्यादी पाटील यांच्या इंद्रायणी पार्कच्या मुख्य रस्त्यावर ठेवली.
संबंधित रस्ता वहिवाटीसाठी बंद केला. तुम्ही कसे बांधकाम करता व कसे येता-जाता आम्ही बघून घेतो, अशी धमकी दिली. प्लॉटिंगमधील बांधकामाचे काम देण्याची मागणी केली. बांधकामाचे काम दिले तरच कंटेनरची केबिन काढण्यात येईल, असे धमकावून खंडणीची मागणी केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.