- वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे वार्ताहर (दि. १६ मार्च २०२५) :- ‘मला मिळालेला पुरस्कार सर्व वारकरी, धारकरी व लाडक्या बहिणींना समर्पित करतो. भंडारा डोंगर हा वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. नद्या प्रदूषण रोखण्यासाठी लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे, अस मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आयोजित गाथा पारायण आणि कीर्तन सप्ताहातील सोहळ्यास त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली), भंडारा डोंगर समितीचे प्रमुख बाळासाहेब काशिद आणि वारकरी सांप्रदाय, नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शांती ब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर यांचे गुरुपूजन झाले. नंतर बाबांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. कदम माऊली यांनी वारकऱ्यांच्या वतीने इंद्रायणीच्या स्वच्छतेची मागणी केली. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याला वारकरी भवन व्हावे, वाखरीला मोकळ्या जागेत काँक्रीट व्हावे, भंडारा संस्थांनाला भोवतालची जागा जोडून द्यावी, वारकरी संप्रदायातील पद्मश्री पुरस्कार कुऱ्हेकर बाबांना मिळावा अशी मागणी केली.
जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे आहे, असे सांगत ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांचे बीजेनिमित्त कीर्तन झाले. शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर बाबांच्या आशीर्वादाने हा सोहळा सुरू झाला म्हणूनच हा सोहळा यशस्वी झाला. भंडारा डोंगरावर सुरू असलेल्या तुकाराम महाराज मंदिराच्या कामाला गती मिळावी म्हणून सोहळा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी घेण्याची सूचना अमलात आणली. सुरुवातीला सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः टाळकरी, भाकरी बनवून देणाऱ्या महिला, पोळ्या, मांडे बनवणाऱ्या महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भंडारा डोंगर समितीला ही त्यांनी धन्यवाद दिले.