न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२५) :- “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे… पक्षी हे सुस्वरे आळवीती” अशा प्रकारच्या अभंगातून निसर्गाशी नाते जोडत शेकडो वर्षापूर्वी पर्यावरणाचा संदेश देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे केवळ संतच नव्हते, तर ते अंधश्रध्दा निर्मूलनासाठी,समाजहितासाठी आयुष्य व्यतीत करणारे थोर समाजसुधारकही होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या संत तुकारामनगर तसेच भक्ती-शक्ती चौक निगडी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील अभिवादन कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम तसेच माणिक अहिरराव, माधुरी आंबेकर, रेवती सौदीकर, वंदना जोशी आदी उपस्थित होते. तर निगडी येथील कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते धनाजी येळकर पाटील, वैभव जाधव, सागर तापकीर आदी उपस्थित होते.