न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था संचलित केली जाते. मोरवाडी येथे संस्थेची इमारत आहे. मात्र, सदर इमारत जुनी झाली असून, ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आणि राज्य सरकारच्या मदतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरीत कायमस्वरुपी नवीन अध्ययावत सोयी-सुविधायुक्त इमारत उभारावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्यस्थितीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व कासारवाडी येथे 20 ट्रेडसचे प्रशिक्षण देण्यात येते. या ठिकाणी एकूण 42 तुकड्या आहेत. काही दिवसांपूर्वी, महानगरपालिका प्रशासन आणि शहरासह हद्दीलगतच्या औद्योगिक अस्थापना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘भारतातील उद्योगांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करणारे ITI ट्रेड ओळखणे’’ या विषयावर कार्यशाळा झाली. त्यावेळी महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विस्तारीकरण आणि अपग्रेडेशनबाबत चर्चा झाली होती.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विस्तारीकरण आणि नवीन ट्रेडच्या समावेशानंतर शहर आणि सभोवतालच्या परिसरातील औद्योगिक संस्थांशी समन्वय करता येईल. त्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नोकरी व रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.