न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२५) :- सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये फ्लॅट असणाऱ्या मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या व्यक्तींवर नळतोडीची कार्यवाही करणे शक्य होत नाही. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये फ्लॅट असणाऱ्या व महापालिकेच्या थकबाकीदार सभासदाच्या शेअर सर्टिफिकेटवर थकीत मिळकतकराची नोंद ठेवण्याबाबत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांना कळविण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला आहे. ही नोंद झाल्यानंतर हे थकबाकीदार फ्लॅटधारक सोसायटी निवडणुकीस अपात्र होणार आहेत.
महापालिका हद्दीत सर्वसाधारणपणे ६ हजार ६४४ इतक्या गृहनिर्माण सोसायट्या कार्यरत आहेत. या सोसायट्यामधील ७७ हजार ८८६ इतक्या सदनिका धारकांकडे १८० कोटी इतक्या रकमेचा मालमत्ता कर थकित आहे. करसंकलन विभागाने यापुर्वीच शहरातील सर्व सोसायट्यांना कर थकित असलेल्या फ्लॅटधारकांची यादी सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना पाठविली आहे.
सर्व गृहनिर्माण सोसायटीचे सभासद नियुक्त संचालक मंडळ असते. सर्व सोसायट्या संबधित फ्लॅटधारकाला शेअर सर्टिफिकेट देते व त्याची एक प्रत सोसायटी अध्यक्ष व सचिवांकडे सुध्दा असते. याशिवाय याची एक नोंदवही सुध्दा सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांचेकडे जतन केलेली असते. थकीत मिळकतकराची थकबाकीची नोंद संबंधित फ्लॅटधारकाच्या शेअर सर्टिफिकेटवर होण्यासाठी महापालिकेच्या वतीने सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांना विनंती केली आहे. याबाबत गरज असल्यास आवश्यक तो पत्रव्यवहार उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर क्र. ३ व ६, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयाशी केला जाणार आहे. त्यामुळे फ्लॅटचे हस्तांतरण होताना थकबाकी असल्यास सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर भरल्याशिवाय ना हरकत प्रमाणपत्र देता येणार नाही.
महापालिकेचा रहिवासी मालमत्तेपोटी ३०० कोटी, बिगरनिवासी मालमत्तेपोटी ७८ कोटी इतका मालमत्ताकर १५ मार्च २०२५ अखेर वसुल झालेला नाही. मालमत्ताधारकांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात कर थकीत आहे. आर्थिक वर्षाचे केवळ १५ दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे रहिवाशांनी मालमत्ताकर तात्काळ महापालिकेकडे जमा करुन महापालिकेस सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका…











