न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२५) :- समाजाच्या विकासासाठी महिलांचे सबलीकरण अपरिहार्य आहे. केवळ तोंडी आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून महिलांना सक्षम करण्याचे पाऊल उचलले तरच समाजाची खरी प्रगती होईल, असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते डॉ. रोहित पिसाळ यांनी केले. ते धम्मक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महिला मेळाव्यात बोलत होते. हा मेळावा ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रोहित पिसाळ यांच्या हस्ते झाले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रमिलाताई चांदणे होत्या, तर निमंत्रक म्हणून धम्मक्रांती संस्थेचे प्रमोद क्षिरसागर यांनी भूमिका बजावली. यावेळी माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड आणि भिक्खुनी संघाच्या आर्याजी सुमना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. रोहित पिसाळ यांनी आपल्या भाषणात महिलांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्वायत्ततेचा महत्त्व पटवून दिला. ते म्हणाले, “महिला सक्षम झाल्याशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि नेतृत्वगुण महिलांनी आत्मसात केले तरच खऱ्या अर्थाने समतेवर आधारित समाजाची निर्मिती होईल. केवळ कायदे असून उपयोग नाही, तर महिलांनी स्वतः पुढे येऊन संधी स्वीकारण्याची मानसिकता विकसित करणे गरजेचे आहे.”
या मेळाव्यात महिला सबलीकरणावर विशेष मार्गदर्शनपर सत्र घेण्यात आले. यामध्ये विद्याताई राईकवार, नलिनी गायकवाड, अमिता सरवदे, सीमा वानखेडे, संगीताई क्षिरसागर, रिया बनसोडे आणि डॉ. रवी घोसाळे यांनी आपले विचार मांडले. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी योगदान दिले पाहिजे, त्यांना योग्य संधी आणि समानता मिळाली पाहिजे, असा विचार या सत्रात मांडण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता बडवाने यांनी केले.
या मेळाव्यामुळे महिलांना प्रेरणा मिळून त्या अधिक सक्षम होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. महिलांच्या सबलीकरणासाठी यापुढेही असे कार्यक्रम आयोजित करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला.











