न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रात, पूररेषेच्या जागेत निवासी व व्यावसायिक बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे तीन हजार अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आढळून आली आहे. या बांधकामे, पत्राशेड असणाऱ्या जागा व दुकान मालकांना नोटीस देऊन अनधिकृत बांधकामे तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवार (दि. १७) पासून कारवाई सुरू करण्यात येणार होती. मात्र, अतिक्रमण पथकाकडून ती पुढे ढकलली असून महापालिका आयुक्तांनी आदेश देताच कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वेक्षण केले. त्यानुसार शहरात नद्यांच्या पात्रालगत व पूररेषेत निवासी, व्यावसायिक अशी एकूण २९१७ बांधकामे आढळून आली आहेत. यामध्ये निवासी १५०८ आणि व्यावसायिक १३८२ आणि इतर २७ अशी बांधकामे आहेत. त्या सर्व बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान यावर कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
महापालिकेच्या हद्दीतील नदीपात्रालगत व पूररेषेतील निवासी व व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण झाले आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. अनधिकृत बांधकामधारकांना धडक पथकाच्या वाहनाने सर्वत्र फिरवत नदीकाठच्या नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
मनोज लोणकर, उपायुक्त, महापालिका











