- थकीत कर न भरल्याने महापालिकेची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- मोशीच्या बोऱ्हाडेवाडी येथील सिल्व्हर ओक्स सोसायटीतील १०९ थकबाकीदारांकडे ४६ लाख ६७ हजार २८७ रुपयांची थकबाकी आहे. सोसायटीला नोटीस देऊनदेखील मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने अखेर महापालिकेकडून ६ नळजोड तोडून पाणी बंद करण्यात आले.
शहरातील विविध सोसायट्यांमधील फ्लॅटधारकांनी त्यांचा फ्लॅटचा चालू आर्थिक वर्षाचा आणि भकीत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करावा म्हणून त्यांना महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे उपलब्ध असलेल्या त्यांचे मोबाईल कमांकावर वेळोवेळी मेसेज केले आहेत. मालमत्ता कर थकित असणाऱ्या फ्लॅटधारकांना फोन करून मालमत्ता कराचा भरणा विहित मुदतीत करण्यास विनंती केलेली आहे. तरीही फ्लॅटधारकांनी मालमत्ता कराचा भरणा अद्यापही महापालिकेकडे केला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
पालिका हद्दीत सुमारे ६ हजार ६४४ गृहनिर्माण संस्था, सोसायट्या कार्यरत आहेत. या गृहनिर्माण संस्था, सोसायट्यामधील ७७ हजार ८८६ सदनिकाधारक, फ्लॅटधारकांकडे १८० कोटी रुपये रकमेचा मालमत्ताकर थकीत आहे. सोसायटीमधील सदनिकाधारकांच्या थकबाकीकडे करसंकलन विभागाने वसुलीसाठी मोर्चा वळविला आहे. पालिकेच्या मोशी करसंकलन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बो-हाडेवाडीतील गट नं. २७५ मधील सिल्वर ओक्स सोसायटीतील ए विंगच्या एकूण ४८ सदनिकेतील २० थकबाकीदारांकडे ७ लाख ६५ हजार ३२१ रुपये, बी विंगच्या एकूण १०७ सदनिकेतील ७० थकबाकीदारांकडे ३५ लाख ५१ हजार ५४७ आणि सी विंगच्या एकूण ५४ सदनिकेतील १८ थकबाकीरांकडे ३ लाख ५० हजार ४९९ रुपये इतका मालमत्ताकर थकीत आहे.
त्यानुसार, सिल्व्हर ओक्स सोसायटीतील ए, बी आणि सी विगमध्ये १०९ थकबाकीदारांकडे ४६ लाख ६७ हजार २८७ रुपयांची थकबाकी आहे. या तिन्ही विंगला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून १२ नळजोडद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातील सोमवारी ६ कनेक्शन तोडून पाणीपुरवठा बंद केला आहे. दोन दिवसांत धकीत मालमत्ताकर न भरल्यास उर्वरित ६ नळजोड तोडण्यात येणार आहे.
”३१ मार्चपर्यंत सर्व सोसायटीतील सदनिकाधारकांनी मालमत्ता कराची थकीत भरणा करण्यात यावा. अन्यथा यापुढे ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त फ्लॅटधारककडे मालमत्ता कराची धकबाकी असल्यास सोसायटीचे नळ कनेक्शन तोडून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. नळ कनेक्शन तोडणी हे सोसायटीला सांगून करण्यात येईल.”
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, करसंकलन व कर आकारणी विभाग, महानगरपालिका…











