- पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत, १०० हून अधिक नागरिकांनी पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील लिनियर गार्डनजवळ मानवी साखळी तयार केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला विरोध केला. नदी प्रदूषण आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण केली. सकाळच्या फिरायला येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणप्रेमींनी नदी विकास प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी माहिती दिली.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. ‘वृक्षतोड थांबलीच पाहिजे!’, ‘आधी नद्या स्वच्छ करा!’ आणि ‘नद्या वाचवू, निसर्ग टिकवू!’ अशा घोषणा देत त्यांनी नदीसंवर्धनाचा संदेश दिला.
नदी ही आपली माता आहे. आपल्या आईला सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गरज आहे. कर्करोग झाल्यास आपण औषधोपचार करतो, मेकअप नाही! नदीला स्वच्छ करणे आवश्यक आहे. प्रभावी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारल्याशिवाय हे शक्य नाही, असे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले.

















