- पीएमआरडीए आणि केंद्राच्या एनआरसीडीमध्ये सकारात्मक चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- इंद्रायणी, मुळा, मुठा व पवना या नद्यांच्या प्रदूषणाबाबत पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः इंद्रायणी नदीप्रदूषणाबाबत दखल घेतली असून, केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या नॅशनल रिव्हर कंझव्हेंशन डायरेक्टर (एनआरसीडी) यांच्याशी दिल्लीमध्ये चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच प्रकल्पास सुरुवात होईल, अशी माहिती पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय नदी संवर्धन संचनालय, जलशक्ती मंत्रालयअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरसीडी) अंतर्गत मंजुरी न मिळाल्याने हा प्रकल्प थांबला होता.
या प्रकल्पांतर्गत नुकतीच प्राधिकरण आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार, सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, यासोबतच अन्य मुळा, मुठा आणि पवना नदीबाबतही योजना कार्यान्वित करण्यात येत असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
पीएमआरडीए लोणावळा ते आळंदी या टप्प्यामध्ये म्हणजेच जवळपास ८७ किलोमीटर असलेल्या जागेवरती एसटीपी (मलः निसारण केंद्र) उभारणार आहे. यासाठी जवळपास ६७१ कोटी रुपयांचा निधी मान्यता आहे. नॅशनल रिव्हर कंजर्वेशन डायरेक्टर (एनआरसीडी) याकडे प्रलंबित आहे.
सद्यस्थितीमध्ये पीएमआरडीए अंतर्गत असलेल्या लोकवस्तीमधील गटारीचे पाणी थेट नदीपात्रामध्ये मिसळत आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत ३८ एसटीपी केंद्र प्रस्तावित आहेत. त्याचप्रमाणे नाल्याचे प्रदुषित पाणी एकत्रित संकलित करण्यासाठी स्वतंत्र वाहिन्या टाकणे, दरवर्षी होणारी जलपर्णी निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन या बाबीदेखील यामध्ये प्रस्तावित आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणीमध्ये सांडपाणी मिसळणार नाही.
वेगवेगळ्या तीन टप्प्यांमध्ये ग्रामीण भागाचा समावेश आहे. त्यामध्ये अर्बन एरियामध्ये लोणावळा, तळेगाव, आळंदी, वडगाव, देहु आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचा समावेश आहे. येथे सर्वाधिक एसटीपी प्लॅन तर, १५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये इंदुरी, कामशेत, कुसगाव बुद्रुकचा समावेश आहे. तर, त्यापेक्षा कमी असलेल्या कार्ला, वरसोली, जांभूळ, सोलू, तुळापूर, नाणे, आंबी अशा १५ गावांसाठी प्रत्येकी एक एसटीपी प्लॅन आखण्यात आला आहे.
नदी सुधार प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. निश्चित गती मिळेल. त्याबाबत संपूर्ण नियोजन देखील केले आहे. इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत वारंवार पाठपुरावा सुरू देखील केला आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू करण्याचा मानस आहे.
– डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त.











