- शालेय शिक्षणमंत्र्यांचा खुलासा..
- शाळा कधी सुरू होणार? याबाबतही दिल स्पष्टीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) विद्यार्थ्यांसाठी पहिलीचा अभ्यासक्रम हा ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर तयार केला जाणार आहे. या नव्या बदलानुसार पहिलीच्या वर्गाची नवीन पुस्तके येत्या जूनपूर्वी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबरोबरच ‘सीबीएसई’ केंद्रीय मंडळाच्या धर्तीवर वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, यंदा शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. ही माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार, ‘एनसीईआरटी’ च्या धर्तीवर असलेल्या अभ्यासक्रमानुसारच पुस्तके तयार केली जात आहेत. पहिली ते बारावी पुस्तकेही यानुसार टप्प्याटप्प्याने बदलणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पाच वर्षांत पूर्ण केली जाणार आहे. याबरोबरच राज्यात टप्प्याटप्प्याने ‘सीबीएसई’ केंद्रीय मंडळाचे वेळापत्रक लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळांचे भविष्यातील शैक्षणिक वेळापत्रक ‘सीबीएसई ‘प्रमाणे केले जाणार आहे.
यंदा परीक्षाच २४ एप्रिलपर्यंत चालणार असल्याने ‘सीबीएसई’ प्रमाणे १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार नाही. यंदा १५ जूनपासूनच शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर देताना सांगीतले.
मंत्री म्हणाले की, याबाबत विचारविनिमय सुरू आहे, त्यामुळे ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही, असे लेखी उत्तरात म्हटले आहे. शैक्षणिक सत्र १ एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयावरही अद्याप शिक्कामोर्तब करण्यात नसल्याचेही म्हटले आहे.
‘सीबीएसई’ अंतर्गत असलेली पाठ्यपुस्तके इंग्रजी व हिंदी माध्यमात उपलब्ध आहेत, मराठीसह अन्य माध्यमांसाठी ती उपलब्ध करून दिली जाणार असून, राज्य मंडळांच्या शाळांचे वार्षिक वेळापत्रक १५ जूनपासून सुरू होत असून, नवीन शैक्षणिक सत्राची ‘सीबीएसई’च्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून सुरुवात करण्यात येणार आहे, हेही खरे आहे काय? असे प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केले.
त्यास दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले असून, त्यात विचारण्यात आलेली माहिती अंशतः खरी असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक प्रश्न शाळा आणि शिक्षण क्षेत्रातून सवाल उपस्थित होत आहेत.
‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम राज्य मंडळ स्वीकारणार असल्याची घोषणा झाली असली, तरी ती अंशतः खरी असल्याचे उत्तरात त्यांनी म्हटले आहे.