- ‘एक्स’ हँडलवरून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत साधला खुला संवाद..
- चारित्र्य पडताळणीसाठी पोलिसांनी त्रास दिला तर करा या मोबाईलवर तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, विनय कुमार चौबे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंगळवारी त्यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून नागरिकांच्या प्रश्नांना, अडचणींना आणि सूचना यांना उत्तरे देत खुला संवाद साधला. नागरिकांनी वाहतूक समस्या, सार्वजनिक ठिकाणी अनुशासन, महिलांची सरक्षितता, सायबर गुन्हे यांसारख्या विषयांवर थेट प्रश्न विचारले. आयुक्त चौबे यांनी अत्यंत दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढवणे, पारदर्शकता राखणे आणि तक्रारीवर तत्काळ कृती करणे असा होता. ‘डिजिटल संवाद’ हे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे आणखी एक प्रभावी माध्यम बनत आहे. यापुढील काळात असे संवाद नियमित घेण्याचा मानस पोलिस आयुक्त श्री. विनय कमार चौबे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी PCcityPolice आणि @CP-PccityPolice या अधिकृत हँडल्सवर आपले प्रश्न, सूचना, तक्रारी मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यानुसार नागरिकांनी सूचना व तक्रारी मांडत आवाहनाला प्रतिसाद दिला. गत दोन वर्षात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयामध्ये विविध उपक्रम तसेच अधिकारी व अंमलदार यांना आवश्यक असणारे पायाभुत सुविधा उभारणीचे अनुषंगाने एका वाक्यात उत्तर न देता सविस्तरपणे सखोल माहिती दिली.
काही नागरिकांनी वाहतूक संदर्भात प्रश्न विचारले. सर्वच क्षेत्रात आता एआयचा वापर होत आहे. त्यानुसार एआय जनरेटेड एफआयआर दाखल करणार आहात का, असा प्रश्न एका हॅण्डलरने विचारला. ही खूप इंटरेस्टिंग कल्पना आहे. तक्रार नोंद करून घेताना तक्रारदार तसेच समोरच्या व्यक्तीची देखील बाजू समजून घ्यावी लागते. जोपर्यंत एआय दोन्ही बाजूंची तक्रार समजून घेत नाही तोपर्यंत आमच्या पोलिसांच्या नोक-या अबाधित आहेत, असे मजेशीर उत्तर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले.
रात्री उशिरापर्यंत वाढदिवसांचे सेलीब्रेशन केले जाते. त्यावर काय उपाययोजना करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. शिस्तभंग केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई केली आहे. तसेच गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्याच्या सूचना केल्या आहेत.
पासपोर्ट पडताळणीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणीसाठी येणा-या विविध अडचणी येतात. त्यासाठी काय उपाययोजना करणार, असा प्रश्न एका हॅण्डलरने विचारला. याबाबत उत्तर देताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, पासपोर्ट संदर्भात येणा-या कोणत्याही अडचणीबाबत पोलिसांकडून सहकार्य मिळवण्यासाठी 8087705112 हा विशेष क्रमांक जारी केला असून सदर क्रमांकावर नागरिक पासपोर्ट चारित्र्य पडताळणीसाठी येणा-या तक्रारी मांडू शकतात असे सांगितले.


















