न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या जापनीज मेंदूज्वर (जेई) प्रतिबंधक लस मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील दोन लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात आली आहे. शहरात हे लसीकरण अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
शहरातील आरोग्य केंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये ही प्रभावी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण शहरात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत २५ मार्च २०२५ पर्यंत २ लाख ७ हजारांहून अधिक बालकांचे जेई लसीकरण करण्यात आले आहे.
बालकांचे आरोग्य ही आपल्या शहरासाठी प्राथमिकता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यामुळेच जेई लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबवत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालक, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था यांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. भविष्यातही आरोग्य क्षेत्रात अशी परिणामकारक पावले उचलण्याचे नियोजन आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…
- रुग्णालयाचे नाव : लसीकरण झालेल्या बालकांची संख्या…
- आकुर्डी रुग्णालय : ३० हजार ९९७
- भोसरी रुग्णालय : ३६ हजार ६७९
- जिजामाता रुग्णालय : ३१ हजार ६४०
- सांगवी रुग्णालय : २२ हजार ११८
- तालेरा रुग्णालय : २३ हजार २१२
- थेरगाव रुग्णालय : १६ हजार ७३०
- यमुनानगर रुग्णालय : ३८ हजार २४
- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय : ८ हजार १६०












