न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- वाकड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याने हवेची गुणवत्ता ढासळली आहे. तेथे एअर प्युरिफिकेशन यंत्रणा (हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च येणार असून, त्याला स्थायी समितीमध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्रामध्ये सोशल अल्फा ही संस्था पंजुरी लॅबसोबत काम करत आहे. सोशल अल्फा ही सामाजिक संस्था असून, ती हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यंत्रणा बसवते. या आधी या संस्थेने बंगळुरू व दिल्ली येथे काम केले आहे. सोशल अल्फा, पंजुरी लॅब, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन 3 सोसायटी आणि महापालिका यांच्या वतीने हे काम करण्यात येणार आहे.
जानेवारी महिन्यामध्ये संबंधित संस्थेने पर्यावरण विभागामध्ये सादरीकरण केले आहे. यामध्ये त्यांनी महापालिका हद्दीमध्ये एअर प्युरिफिकेशन यंत्रणा बसवण्यासाठी लागणारा खर्च व ठिकाण याबाबत विचारणा केली. त्यांना पर्यावरण विभागामार्फत सहमती दिली आहे.
एअर प्युरिफिकेशन यंत्रणा उभारण्यासाठी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. यंत्रणा बसविण्यासाठी वाकड, भूमकर चौक येथील स्थळ निश्चित केले आहे.
यासाठी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. महापालिका २५ टक्के म्हणजेच ८ लाख ५० हजार रुपये खर्च देणार आहे. जानेवारी २०२६ नंतर चालन व देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी २ लाख २५ हजार रुपये खर्च येणार आहे. वाकड, भूमकर चौक पाण्याची टाकी येथील स्थळ यासाठी निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या इमारतीचे काम सुरू असून, प्रदूषण पातळी वाढली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.











