न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- महापालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी, मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात १०० फूट उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा कांस्य धातूचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
पुतळा उभारणीचे काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि योग्य प्रकारे व्हावे, म्हणून पुण्यातील सीओईपीची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक केली आहे. त्यासाठी सीओईपीला ३० लाख रुपये शुल्क देण्यात येणार आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
ते काम क क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागामार्फत करण्यात येत आहे. पुतळा उभारणीसाठी बोऱ्हाडेवाडी येथे चौथर्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष पुतळा उभारणीस लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या कामासाठी क्रिएशन्स इंजिनिअर्स हे प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
महापुरुषांचा भव्य पुतळा असल्याने दुर्घटना घडू नये तसेच कामात काही चूक होऊ नये, म्हणून काम अधिक चांगल्या दर्जाचे आणि मजबूत होण्यासाठी या कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबईतील आयटीआय किंवा पुण्यातील सीओईपी संस्थेची त्रैयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्याची विनंती प्रकल्प सल्लागार एजन्सीने महापालिकेकडे केली होती. त्यानुसार या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सीओईपीची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक केली आहे. त्यासाठीच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.











