- अति. आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचा विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- ‘नांदेड सारख्या जिल्ह्यात मी लहानच मोठा झालो. पूर्वी शाळेत बेंच नव्हते. शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी कला शाखेत पदवी घेतली, त्यानंतर डी.एड केले. तीन वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. परंतु आई सारखी म्हणायची की, काहीतरी वेगळे कर. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यातून सुरुवातीला गट विकास अधिकारी म्हणून काही दिवस काम केले. आज मी आपल्या समोर अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत आहे. सातत्यपूर्ण मन लावून तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे धावलात, तर यश निश्चित मिळते, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना काय काळजी घ्यावी,करिअरची निवड कशी करावी, अपयश आल्यानंतर खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करीत यशाला गवसणी कशी घालावी, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना करतानाच एकप्रकारे जीवनात यशस्वी कसे व्हावे, याचा कानमंत्रच शाळकरी विद्यार्थ्यांना दिला.
निमित्त होते महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी मधील उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधिनी शाळेत आयोजित केलेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे. यावेळी जांभळे पाटील यांनी व्यासपीठावर न बसता थेट विद्यार्थ्यांसोबत बसून त्यांच्याशी खेळ, अभ्यास, छंद आणि भविष्यातील संधी आदी विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.
शाळकरी विद्यार्थ्यांचा परीक्षा जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा प्रबोधिनी शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माध्यमिक शिक्षणाधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक जयराम वायळ, क्रीडा प्रमुख ऋषिकांत वचकल, शिक्षक सोनाली पाटील, संग्राम मोहिते, राहुल मोरे, अक्षता बांगर, मनोज राऊत, प्रमिला अल्हाट, दत्तात्रय कोळी, दिनेश राऊत, विजय पाटील, प्रियंका पाटील, गौरीगाडेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.














