न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. २९ मार्च २०२५) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानातील योगदानासाठी १४ एप्रिल रोजी जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, हा निर्णय युपीएससी, सीव्हीसी, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, केंद्रीय माहिती आयोग आणि इतर महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना लागू राहील. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच शाळा व महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी, १४ एप्रिल हा सोमवार असल्याने, देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये ही सुट्टी लागू असेल. अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की या सुट्टीच्या काळात शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतील. ज्यामुळे लोकांना विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांच्या सामाजिक सुधारणांचे स्मरण करता येईल. ही सुट्टी केवळ सुट्टीचा दिवस नाही तर समाजात जागरूकता, समानता आणि एकता वाढवणारा एक प्रसंग आहे.


















