न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२५) :- महापालिकेच्या वतीने किवळे येथे भारतरत्न राष्ट्रीय उद्यान साकारण्यात येणार आहे. देशात आजपर्यंत भारतरत्न मिळालेल्या ५३ मान्यवरांचे अर्धाकृती पुतळे, पुरस्कार स्मृतिचिन्ह व माहितीचे म्युरल्स या उद्यानात बसविले जातील.
भारतरत्न उद्यानात २५ फूट उंचीचे भारतरत्न पुरस्काराचे स्मृतिचिन्ह व भारतरत्न पुरस्कारप्राप्त ५३ मान्यवरांचे अर्धाकृती पुतळे, म्युरल्स बसविण्यासाठी महापालिका सभेची मान्यता महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
पुतळ्यांच्या क्ले मॉडेलला शासनाच्या कला संचालनालयाकडून मान्यता मिळाली असून, मुख्य वास्तुशास्त्र विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या भारतरत्न उद्यान या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करून कामाचे कार्यादेश दिले आहेत. उद्यानासाठी आरक्षित एकूण १.५० हे. आर क्षेत्रापैकी ०.६४ हे. आर ताब्यात आहे. पालिकेच्या ताब्यातील एकूण क्षेत्रापैकी ०.२० हे. आर क्षेत्रावर पाणीपुरवठा विभागाने उंच पाण्याची टाकी बांधलेली आहे उर्वरित ०.४४ हे. आर क्षेत्र पालिकेच्या ताब्यात असून, या ठिकाणी भारतरत्न राष्ट्रीय उद्यान उभारण्यात येत आहे.
किवळे येथे भारतरत्न राष्ट्रीय उद्यान आमदार निधीतून साकारले जात आहे. त्यासाठी आवश्यक मान्यता घेण्यात येत आहेत. भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचे अर्धपुतळे त्यांच्याबद्दलच्या माहितीचे मुरल्स या उद्यानात बसविले जाणार आहेत.
– विजय जाधव, कार्यकारी अभियंता मनपा…











