- आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू आहेत. सध्या बुथ व मंडल स्तरावरील नियुक्त्या करण्यात येत आहेत. मात्र, शहराध्यक्ष पदाबाबत राज्य पातळीवर निर्णय होतो. तो निर्णय घेण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना आहेत. महिनाभरात भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नवा चेहरा असेल, असे स्पष्टीकरण आमदार तथा पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शनिवारी दिले.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिंचवड मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली असून, या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत, सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड भाजपचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके तसेच सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर भोंडवे, विनायक गायकवाड आदि उपस्थित होते.
चिंचवड मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत, सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचेही स्पष्ट केले.

















