न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- शाळेच्या एचआर विभागात काम करणाऱ्या महिलेला बडतर्फ करण्याचा निर्णय शाळेने घेतला. त्यानंतर एचआर महिलेने शाळेची बदनामी करत शाळेचा लॅपटॉप शाळेला परत न करता विश्वासघात केला. हा प्रकार एक डिसेंबर २०२४ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत देहूगाव येथे घडला.
आलोककुमार ओबेरॉय (४२, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३८ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलोक कुमार हे अभंग इंग्लिश मीडियम स्कूल, देहूगाव या शाळेचे संचालक आहेत. शाळेमध्ये आरोपी महिला एचआर म्हणून काम करत होती. तिने शाळेत काम सुरू केल्यापासून कामावर उशिरा येणे, गैरहजर राहणे, कामगारांचे मनोबल खच्चीकरण होईल असे वर्तन केले. त्यामुळे शाळा प्रशासनाने एचआर महिलेला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर महिलेने स्वतः राजीनामा दिला. शाळेची बदनामी होईल असे वर्तन केले. तसेच, शाळेने दिलेला पंधरा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप शाळेला परत न करता विश्वासघात केला. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.















