- प्रशासकीय राजवटीत कोटींची उड्डाणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- भोसरी एमआयडीसी टेल्को रस्त्यावरील गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौकापर्यंतचा सव्वाकिलो मीटर अंतराचा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका अद्यावत पद्धतीने विकसित करणार आहे.
त्या कामासाठी तब्बल ८१ कोटी ७७ लाख ५५ हजार ५५६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिका म्युन्सिपल बॉण्डद्वारे कर्ज काढणार आहे. रस्ते सुशोभीकरणावर मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या या खर्चावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिकेतील प्रशासकीय राजवटीत विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपटी सुरू आहे. दापोडी ते निगडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक तयार करून सुशोभीकरण केले जात आहे. या कामासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असताना प्रशासन अर्बन स्ट्रीट डिजाईच्या संकल्पना राबवत आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे भविष्यात महापालिका आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टेल्को रस्त्यावरील गवळीमाथा ते इंद्रायणीनगर चौकापर्यंतचा सव्वाकिलोमीटर रस्ता अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थापत्य तसेच, जलवाहिनी, ड्रेनेजलाईन, विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर केल जाणार आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.
– प्रमोद ओंबासे, मुख्य अभियंता मनपा…

















