न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- महापालिकेच्या अग्निशामक विभागासाठी अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) या पदाच्या १५० जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेला सात, तर मैदानी परीक्षेला दोन महिने होऊन गेल्यानंतरही ही भरती प्रक्रिया रखडली आहे. निवड समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्त मिळत नसल्यामुळे या पदाच्या अंतिम यादीला विलंब झाल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सद्यःस्थितीत अग्निशामक दलाकडे असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. याचा विचार करून महापालिका प्रशासनाने गेल्यावर्षी अग्निशामक दलासाठी १५० फायरमनची भरती प्रक्रिया राबवली.
फायरमनच्या १५० जागांसाठी एक हजार ५०० अर्ज आले. या परीक्षार्थीची २९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ८९५ उमेदवार उत्तीर्ण झाले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाचणी घेण्यास नकार दिल्याने ही परीक्षा रखडली होती.
त्यानंतर २२ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात शंभर गुणांची शारीरिक क्षमता मैदानी चाचणी घेण्यात आली. शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणीनंतर १५० जागांसाठी ६४३ उमेदवार पात्र ठरले आहेत.
या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर १५ दिवसांत अंतिम यादी जाहीर केली जाणार होती. मात्र, यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक होणे गरजेचे आहे. या बैठकीला मूहर्त मिळत नसल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे.
फायरमन संदर्भात निवड समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. बैठक झाल्यानंतर चार दिवसांत पात्र उमेदवारांची अंतिम यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना अग्निशामक दलात रुजू करून घेतले जाईल.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग…











