- नगररचना विभागाकडून जागा मालकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२५) :- मंजूर विकास आराखड्यानुसार चिखलीतील रस्ते व आरक्षणे ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी जागा मालकांचे शिबिर मंगळवार (दि. ८) आणि बुधवारी (दि. ९) महापालिकेच्या चिखली गावठाणातील मुले व मुलींच्या शाळेत आयोजित केले आहे. दोन्ही दिवस सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच अशी शिबिराची वेळ आहे, अशी माहिती नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.
जमीन वा जागा मालकांच्या प्रबोधनासाठी जागेवर नकाशा दाखवून त्यांचे क्षेत्र रस्त्याने बाधित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले जाणार आहे. रस्त्याने बाधित जागांचा आगाऊ ताबा शिबिरातच घेण्यात येणार आहे. भविष्यात जमीन मालकांनी टीडीआर किंवा एफएसआयसाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांना बाधित क्षेत्राचा टीडीआर किंवा एफएसआय एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नियमानुसार देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.
जमीन मालकांनी जागेची मालकी सिद्ध करण्यासाठी सात/बारा, उतारा, मोजणी नकाशा (असल्यास) सोबत आणावा. तसेच, प्रपत्र शुल्क शंभर रुपये जमा केल्यानंतर जागेवरच अ व ब प्रपत्र त्वरित देण्यात येणार आहे. त्यामुळे जमीन मालकांनी या दिवशी कागदपत्रांसह उपस्थित राहून जागेचा आगाऊ ताबा देऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी केले आहे.














