न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२५) :- महापालिकेच्या मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडले जाते. या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर कसा होतो, किती पाणी नदीत सोडले जाते, याचा हिशोब ठेवण्यासाठी महापालिका वेब अॅप्लिकेशन तयार करणार आहे. त्यासाठी १० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढतच आहे. शहरासाठी उपलब्ध होणारे पाणी भविष्यात पुरेसे होणार नाही. त्यासाठी पाण्याच्या पर्यायी स्त्रोत निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच, महापालिकेच्या शहरातील मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर केला जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरल्यास पिण्याची पाण्याची मोठी बचत होते. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या ३० नोव्हेंबर २०१७ च्या निर्णयानुसार सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर करणे महापालिकेस बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, शासनच्या स्वच्छ भारत अभियान, जल ही अमृत, वॉटर प्लस प्लस, माझी वसुंधरा अभियानात सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर धोरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी या अभियानात गुण दिले जातात.
वेब अॅप्लिकशन तयार करून हे प्रक्रिया केलेले पाणी शहर तसेच, परिसरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, तळवडे, हिंजवडी एमआयडीसीतील उद्योगांना दिले जाणार आहे. सध्या महापालिकेकडून दापोडीतील सीएमई या संस्थेला १० एमएलडी पाणी दिले जाते. टाटा मोटर्स कंपनीने १.५ एमएलडी पाणी देण्याची मागणी केली आहे. तसेच, काही हाऊसिंग सोसायट्यांना टँकरद्वारे हे पाणी दिले जाते. भविष्यात स्वतंत्र वाहिनी टाकून हे पाणी देण्यात येणार आहे. त्याचे बिलिंग व नोंद ठेवण्यासाठी वेब अॅप्लिकेशन उपयुक्त आहे. त्याद्वारे कोणत्या संस्थेने किंवा व्यक्तीने किती पाणी वापरले याचा हिशोब तसेच, इतर माहिती उपलब्ध होणार आहे. त्यात क्युआर कोडही असणार आहे. हे वेब अॅप्लिकेशन सुस्टेन अॅण्ड सेव्ह प्रा. लि. ही एजन्सी तयार करणार आहे.














