- दोन अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- चिंचवड शाहूनगर येथील राजर्षी शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासणीअंती या कामात अनियमितता झाल्याचे शिक्कामोर्तब झाले.
आयुक्त शेखर सिंह यांनी दोन अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. तसेच ठेकेदार व सल्लागाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम करण्यासाठी महापालिकेने १ कोटी ६६ लाखांचा खर्च केला आहे. मात्र, निविदेतील अटी-शर्तीनुसार उद्यानाचे काम न झाल्याचा आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला होता. त्यांनी या कामात तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
त्यावरून हलगर्जीपणा व शिथिल पर्यवेक्षणाचा ठपका ठेवत कार्यकारी अभियंता सुनील दत्त नरोटे व कनिष्ठ अभियंता अस्मिता साळुंखे यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले. यासह कामात सल्लागार हार्दिक पांचाळ अॅन्ड असोशिएट्स व संबधित काम करणारा ठेकेदार यांच्यावर काळ्या यादीत टाकणे व अनुषंगिक कारवाई करण्याबाबत आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे.
राजर्षी शाहू उद्यानाच्या कामाबाबत तपासणीअंती दोन अभियंत्याविरुध्द खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणातील संबंधित सल्लागार व ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त होताच त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका…












