न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- रस्त्याने धावणाऱ्या कारला अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास दापोडी चौक येथील अशोका हॉटेलसमोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक गौरव प्रकाश बोरा हे गाडी चालवत होते. दापोडी चौकात अचानक इंजिन भागातून धूर येऊ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. काही क्षणातच गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत त्यांनी वाहनातून बाहेर पडताच, आग आणखी भडकली.
गौरव बोरा यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ कारभोवतीचा परिसर सुरक्षित करत आग आटोक्यात आणली. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, इलेक्ट्रिकल फॉल्ट, इंजिन ओव्हरहिटिंग किंवा इंधन गळती यापैकी कुठल्यातरी कारणामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत दापोडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.