न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी उद्योग सुविधा कक्ष सुरू केला होता. तो कक्ष सुरू केल्यानंतर काही दिवसांत बंद पडला. तो विभाग आता पुन्हा सुरू केला आहे. तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी हा कक्ष सुरू केला होता. लक्ष न दिल्याने तो विभाग काही महिन्यांत बंद पडला.
या कक्षाअंतर्गत उद्योजक आणि महापालिका यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून औद्योगिक अडचणींचे निराकरण, संवाद आणि सुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या उद्योग सुविधा कक्षाबद्दल माहिती देण्यासाठी उद्योजकांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तसेच उद्योग व सुविधा कक्ष व CSR प्रमुख निळकंठ पोमण, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, अजिंक्य येळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी दीपक पवार, उद्योग सुविधा कक्षाचे संचालक विजय वावरे आणि सीएसआर सल्लागार श्रुतिका मुंगी आणि शहरातील उद्योजक उपस्थित होते.












