न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ०८ एप्रिल २०२५) :- विद्यार्थ्यांनी फक्त विषयाचा अभ्यास करुन उच्च श्रेणी मिळवली पाहिजे, हा विचार योग्य नाही. तर त्या विद्यार्थ्यांमधील क्षमता, कौशल्ये विकसित करणे व त्याचा सर्वांगीण विकास करणे हा शिक्षणाचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाचा येवू घातलेला सीबीएसईचा अभ्यासक्रम उपक्रमांवर आधारित आहे. तंत्रज्ञान, उपक्रम यांचा वापर करुन विद्यार्थ्यांसमोर नवनवीन स्वरुपात अभ्यासक्रमाची मांडणी केली जाणार आहे. काळाच्या ओघात टिकून रहायचे असेल तर हे बदल स्वीकारावे लागणार आहेत. तसेच शिक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडताना ती अधिक अद्ययावत, तंत्रज्ञानयुक्त, जबाबदार असली पाहिजे असे मत पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालाचे प्राचार्य डॉ.मिलिंद नाईक यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व कार्यपद्धती’ या विषयावर डॉ.मिलिंद नाईक यांनी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध अभ्यासक्रम समितींवर कार्यरत असणारे डॉ. मिलिंद नाईक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.धोरणाची अंमलबजावणी, त्यामागील उद्दिष्टे, शिक्षकांची भूमिका व बदलती कार्यपद्धती या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. विषयातील सखोल ज्ञान देणे हे शिक्षकाचे काम नाही, तर सहज उपलब्ध असणाऱ्या माहितीतून निवड कशी करावी? प्रश्न विचारण्याचे कौशल्य कसे वाढवावे? अडचणी कशा सोडवाव्यात? असे वातावरण निर्माण करणे हे शिक्षकाचे काम आहे. आपण दैनंदिन जीवनात पावलोपावली निर्णय घेत असतो, नवीन परिस्थितीला सामोरे जात असतो. पण विद्यार्थी गेली वर्षानुवर्षे एकाच साच्यातील शिक्षण घेत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यागणिक हा शिक्षणाचा अनुभव वेगवेगळा आहे आणि हा नवनवीन स्वरुपातील अनुभव प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे, ही शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे असे ठाम मत नाईक यांनी मांडले.
सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी शिबिराच्या उद्देशावर प्रकाश टाकत प्रास्ताविक केले तर प्राचार्या डॉ.कविता अय्यर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली आढाव यांनी केले.