- ‘ फ्ल्यूगार्ड ‘ औषधाचा स्वस्तातला ब्रँड भारतीय बाजारपेठेत दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच त्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. कोरोनावर उपचारात सध्या केंद्रीय औषधे महानियंत्रकांनी अनुमती दिलेल्या एकमेव फॅव्हीपिरावीर या औषधाचा आणखी एक ब्रँड भारतीय बाजारपेठेत दाखल होतो आहे. भारतातील सर्वात मोठ्या सन फार्मास्युटीकल या कंपनीने ‘ फ्ल्यूगार्ड ‘ या नावाने हे औषध बाजारात आणले आहे.
कोरोनाची सौम्य व मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना फॅव्हीपिरावीर हे औषध गुणकारी ठरते असा दावा महिन्याभरापूर्वी भारतातील ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने केला होता. या औषधाच्या तीन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचेही सिद्ध झाले आहे.
आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजे प्रतिगोळी ३५ रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. महिन्यापूर्वी बाजारात दाखल झालेल्या दुसऱ्या कंपनीच्या याच औषधाच्या ब्रँडच्या तुलनेत ही किंमत तब्बल ७० टक्क्यांने कमी असल्याने रुग्णांच्या उपचारावरील खर्चात कपात होण्यास मदत होणार आहे.
भारतीय औषधांच्या बाजारपेठेत हैदराबादस्थित हेट्रो फार्माने ५९ रुपये प्रतिगोळी दराने आपला फॅवीवीर हा बँड बाजारात उतरविला आहे. सिप्लाचा ६८ रुपये प्रतिगोळी या दराने निश्चित केलेला सिप्लेन्झा यासह डॉ. रेड्डीज लॅबचा ॲवीगन हा बँड बाजारात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे.
ग्लेनमार्कने सर्वप्रथम हे औषध १०५ रुपये प्रतिगोळी या दराने बाजारात आणले. १५ दिवसांत कंपनीने हा दर कमी करून प्रतिगोळी ७५ रुपये केला. यानंतर पुण्याच्या ब्रिलियंट फार्मान ५९ रुपयांत फॅवीटन हे औषध बाजारात आणल्यानंतर जेनर्बक्ट फार्मा या कंपनीने हेच औषध फॅवीव्हेंट या नावाने प्रतिगोळी ३९ रुपये या दराने बाजारात उपलब्ध केले. आता सन फर्माने प्रतिगोळी ३५ रुपये दराचे ‘ फ्ल्यूगार्ड ‘ हे औषध बाजारात आणून ही स्पर्धा अधिक तीव्र केली आहे.