- शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचीही झाली उकल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२०) :- पुणे आणि पिंपरी – चिचवड परिसरात बुलेट चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून आठ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली.
सुमित सुनील सावंत ( १९, रा. पारखेवस्ती, हिंजवडी), प्रशांत भीमराव गायकवाड (१९, रा. डांगेचौक, थेरगाव), चेतन उर्फ श्रीपती शिवाजी कातपुरे (१९, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), वैजनाथ नागनाथ चौधरी (२२, रा. देवगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, त्यांचे साथीदार आशिष भिसे आणि फान्सीस (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हे फरार झाले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिस ठाण्यात बुलेट दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली, मारुंजी आणि हिंजवडी येथून बुलेट दुचाकी चोरून नेणारा चोर मारुंजी येथील कोलते पाटील गेटजवळ थांबला आहे. त्यानुसार त्यांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच सुमित पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाकशी केली असता त्याने एक बुलेट चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. तसेच हिंजवडी, चिंचवड आणि वारजे माळवाडी परिसरातून बुलेटची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमितच्या अन्य तीन साथीदारांना अटक केली. चोरटे पुणे जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा येथे पाच ते दहा हजार रुपये किमतीला विकत होते. आरोपी फान्सीस याच्या मदतीने ही बुलेट विक्री केली जात होती. चोरट्यांनी परांडा) येथील वैजनाथ चौधरी याला आणि अन्य लोकांना या बुलेट विकल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीच्या आठ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच, चिंचवड पोलीस ठाण्यातील एक आणि वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील एक असे एकूण सात वाहनचोरीचे गुन्हे उपडकीस आले आहेत.