- राज्याच्या आरोग्य कल्याण विभागाकडून आचारसंहिता जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- राज्याच्या आरोग्य कल्याण विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्या रुग्णाला द्यायचे याबाबतची आचारसंहिता निश्चित केली आहे. त्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन हे फक्त ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णास देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी रेमडेसिवीर इंजेक्शन व टॉसिलिझुमॅब इंजेक्शन च्या वापराबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या निर्णयाची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनलासुद्धा दिली आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाने दिलेल्या आचारसंहितेनुसार पूर्णपणे तपासणी व आवश्यक चाचण्या करूनच रुग्णाची स्थिती बघून आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे. हे औषध कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्ण व त्याचे नातेवाईक औषधे मिळण्यासाठी धावपळ करतात, ही बाब योग्य नाही.
तसेच रुग्णालयातील वॉर्डबॉय / नसिंग स्टाफने रुग्णांच्या नातेवाईकांकडून औषध उपलब्ध करून देण्यासाठी जास्त पैशांची मागणी करणे अत्यंत गंभीर असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. करोनाच्या गरजू रुग्णांना तत्काळ उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यपद्धतीचे अवलंबन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या विचारात घेऊन गरजेनुसार मर्यादित साठा खरेदी करावा. हॉस्पिटल कोविड वॉर्डमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वापराबाबत रजिस्टर तयार करावे. त्यामध्ये पेशंटचे नाव व पत्ता, औषधाचे नाव, समूह क्रमांक, वापरलेली संख्या व आकारलेली किंमत या बाबींचा समावेश करावा. काही कारणाने रेमडेसिवीर इंजेक्शन औषधाचा पूर्ण डोस देण्यात आला नाही तर त्याचा उर्वरित साठा हॉस्पिटल फार्मसी किंवा रुग्णांच्या नातेवाईकास परत करावा व त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवावे. कोविड वॉर्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवावे व हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास हॉस्पिटल व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.