न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- तळेगावमध्ये एका ५५ वर्षीय आजारी व्यक्तीला गंभीर जखमी करून जिवंत जाळून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास तळेगावमध्ये उघडकीस आली आहे.
या प्रकरणी आरोपी नारायणसिंग विजयसिंग झवेरी (वय- २५ रा. तळेगाव) याला अटक करण्यात आली असून विजय भगवान झवेरी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत आणि आरोपी हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. अवघ्या एका तासाच्या आत तळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय झवेरी हे त्यांच्या घरात झोपले होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असून घरात त्यांची पत्नी आणि आणखी एक महिला घरात झोपल्या असताना पहाटेच्या सुमारास आरोपी नारायणसिंग याने दरवाजा ठोठावला. गोंधळ घालत मला घरात घ्या अन्यथा तुम्हा दोघांना मारतो अशी दमदाटी केली. दरवाजा उघडताच मयत यांच्या पत्नीला आरोपीला धक्काबुक्की केल्याने त्या घाबरून घराबाहेर गेल्या. मयत झवेरी यांना काठीने त्यानंतर दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि गोधडीसह त्यांना जिवंत पेटवून दिले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.