न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसें.) :- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली रिव्हर रेसिडेंन्सी परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली आहे. यावेळी रिव्हर रेसिडेंन्सी, ऐश्वर्यम, स्वराज, स्पारा, क्रिस्टल व क्लॉलेस्स या सोसायटीमधील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चिखलीमधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाच्या (एसटीपी) कामास या परिसरातील नागरिकांनी विरोध केला असून ‘एसटीपी’चे काम रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. हा प्रकल्प पूररेषा निळी आणि लालरेषा अंतर्गत येत असल्याने प्रस्तावित एसटीपी हा प्रकल्प अनधिकृत आहे. महापालिका अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई करीत असताना स्वत: अवैध बांधकाम करीत आहे.
हा प्रकल्प झाल्यास या परिसरातील नागरिकांना भविष्यात अनेक समस्यांना सामारे जावे लागेल. वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, पर्यावरण हानी, आरोग्याच्या समस्या उद्भवणार असल्यामुळे, या परिसरातील नागरिकांचा या प्रकल्पास तीव्र विरोध असल्याचे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे व प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.