- बांधकामावर काम करताना सुरक्षा साधने न दिल्याचा आरोप;
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १० ऑक्टोबर २०२६) :-बांधकामाच्या ठिकाणी काम करताना आवश्यक सुरक्षा साधने आणि उपाययोजना उपलब्ध करून न दिल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना थेरगाव येथे घडली. याप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप करत दोन जणांविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन काळे असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास थेरगाव येथील समर्थ कॅरीना सोसायटीच्या इमारतीवर नितीन काळे काम करत होते. त्यावेळी त्यांना कामासाठी आवश्यक असलेली सुरक्षा साधने तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप फिर्यादीने केला आहे. संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे नितीन काळे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मृत कामगाराच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून संतोषसिंग पुजारी (रा. आकुर्डी) आणि कैलास विलास म्हस्के (रा. काळेवाडी फाटा, थेरगाव) यांच्याविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत आहेत.

















