- कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १० ऑक्टोबर २०२६) :-दुचाकीवरून पती आणि मुलासह प्रवास करणाऱ्या महिलेचा कारच्या अपघातात मृत्यू झाला, तर तिचा लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे पवना बँकेसमोर घडला. वर्षा रविंद्र सुशिर असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी रविंद्र भानुदास सुशिर (वय ४१, रा. कासारसाई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक श्रीहरी मोरहरी वाघमारे (वय ३७, रा. चांदखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र सुशिर हे पत्नी वर्षा आणि मुलगा आयुष यांच्यासह होंडा शाईन दुचाकीवरून कासारसाईकडून हिंजवडीच्या दिशेने जात होते. मारुंजी येथील पवना बँकेसमोर त्यांची दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या हुंडाई एलांट्रा कारची त्यांना धडक बसली. या अपघातात कारचे चाक वर्षा यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा आयुष याला किरकोळ दुखापत झाली.
या प्रकरणी कारचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करीत आहेत.


















