- पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणातून चौघांचा हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एका २७ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी एकाने तरुणाच्या पोटावर चाकूने वार केला, तर दुसऱ्याने डोक्यात बांबूने मारहाण करून त्याला जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) मध्यरात्री अडीचच्या सुमारास काळेवाडीतील नढे नगर येथे घडली.
याप्रकरणी पवन संजय वेदपाठक (वय २७, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय शिवाजी अहिरे (वय अंदाजे २७), रोहित शिवाजी अहिरे (वय अंदाजे २५) आणि दोन महिला (वय अंदाजे २२ व २४) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन वेदपाठक यांचे त्यांच्या पत्नीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच कारणावरून मध्यरात्री अडीचच्या सुमारास चारही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या पोटावर चाकूने वार केला, तर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोक्यावर बांबूने मारहाण केली. या हल्ल्यात पवन वेदपाठक जखमी झाले.
या प्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.


















