- १२०० चौरस मीटर बांधकाम जमीनदोस्त; ५० महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांचा बंदोबस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल्ल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहा अतिक्रमणविरोधी पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान तैनात करण्यात आले होते. तसेच महापालिकेचे दोन मजूर आणि दहा कंत्राटी मजूर सहभागी झाले होते.


















