- गळ्यात चाकू खुपसून आजीची हत्या केल्याची नातवाची पोलिसांसमोर कबुली;
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. १० ऑक्टोबर २०२६) :- मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या आजीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवी येथे शुक्रवारी (दि. ९) सकाळी घडली.
मंगल बाबुराव शिंगोरे (वय ६०, रा. नवी सांगवी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ओंकार किसन शिंगोरे (वय ३०, रा. पिंपळे गुरव) याने शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होऊन, मालमत्तेच्या वादातून आजीच्या गळ्यात चाकू खुपसून तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.
या माहितीच्या आधारे सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता मंगल शिंगोरे या घरातील बाथरूममध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सांगवी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर, सहायक पोलीस निरीक्षक नारायण पाटील, पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव आणि नागनाथ जावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

















